अंजनगाव सुर्जी:-
दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावांमध्ये १ डिसेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असून, १० टक्के पाणीकपातही लागू करण्यात आली आहे.
आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) अंजनगाव सुर्जी उपविभागाने पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. याअंतर्गत १ डिसेंबरपासून १० टक्के पाणीकपातीसह एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल.
उपविभागाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेशी जोडलेली ६९ गावे, दर्यापूर शहर आणि त्याच्याशी संलग्न १०५ गावांना या नियोजनानुसार पाणी मिळेल.
शहानूर धरणातील पाणीसाठा सातत्याने कमी होत असून, सध्या धरणात केवळ ७० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंजनगाव सुर्जी उपविभागीय अभियंत्यांनी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सचिवांना पत्र पाठवून या नियोजनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
उन्हाळ्यात गंभीर पाणीसंकट निर्माण होऊ नये म्हणून नागरिकांनी आत्तापासूनच पाण्याची बचत करावी. पाणी विनाकारण वाया घालवू नये आणि उपलब्ध पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा, असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
पर्यटन नगरी चिखलदरा येथे १९ नोव्हेंबरपासून तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कालापाणी तलाव आणि शक्कर तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे जीवन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे.
पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक नळ जोडणीला तोटी बसवणे, पाण्याची नासाडी रोखणे आणि गरजेपुरताच पाण्याचा वापर करणे याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
