दि.३ वर्धा
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातील लिपिक अभिषेक जगतार याने स्वतःच्या पगारात बेकायदेशीरपणे वाढ करून चक्क ७० लाख ५१ हजार १९० रुपयांच्या निधीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अभिषेक जगतार याच्याकडे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार देयक तयार करून शासनाला सादर करण्याची महत्त्वाची जबाबदारी होती. याचा गैरफायदा घेऊन त्याने स्वतःचे मूळ वेतन २३,१०० रुपये असताना त्यात कधी ७०,६०० रुपये तर कधी ३१,६०० रुपयांची परस्पर वाढ केली. चोरी पकडली जाऊ नये म्हणून तो ऑनलाइन प्रणालीमध्ये वाढीव रकमेचे देयक सादर करायचा, तर कार्यालयातील रेकॉर्डसाठी फाईलमध्ये मूळ वेतनाच्याच ऑफलाइन प्रती ठेवत असे. गेल्या वर्षभरापासून हा काळाबाजार सुरू होता.
लेखा व वित्त विभागाकडून समुद्रपूरच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामध्ये अंतर्गत लेखापरीक्षण (ऑডিট) करण्यात आले. या ऑudit दरम्यान जगतार याच्याकडील वेतन देयकांची माहिती मागवण्यात आली असता, आपली पोल उघड होईल या भीतीपोटी त्याने माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरू केली. संशय बळावल्याने जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन रेकॉर्डची पडताळणी केली, तेव्हा दोन्हीमध्ये मोठी तफावत आढळून आली.
हे गंभीर प्रकरण वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांच्याकडे गेले. चौकशीची चक्रे फिरताच लिपिकाने शासकीय निधीचा अपहार केल्याची कबुली दिली असून शासनाचा सर्व पैसा परत करण्याची हमी दिली आहे. त्याने तातडीने १० लाख रुपये शासनाकडे जमा केले असून, उर्वरित रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.