अमरावती, दि. ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ नोव्हेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ७२ नोकरी इच्छुक उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथे ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने एकूण १३२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. प्रत्यक्ष मुलाखतींपूर्वी उमेदवारांना ‘व्होरा टेक्नॉलॉजीस, नागपूर’ कंपनीच्या प्रतिनिधींमार्फत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांचे १०-१० चे गट करून गटचर्चा घेण्यात आली आणि शेवटी प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे ७२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, तसेच व्होरा टेक्नॉलॉजीस कंपनीचे प्रतिनिधी आनंद कुमार आणि एच.आर. मॅनेजर प्रणुती कोटांगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृपा अरगुलेवार यांनी केले, तर पंकज कचरे यांनी आभार मानले.