दिवाळी आली, पण खिशाला परवडेना!


 फराळ महागला, कपडे महागले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले



दि. २३ अमरावती:
दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग असते. घराघरांत फराळाची तयारी सुरू होते, मुलांसाठी नवीन कपडे घेतले जातात आणि नातेवाईकांना भेटवस्तू देण्याची परंपरा जपली जाते. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे या उत्साहाला मर्यादा येत आहेत. मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने रोजचा घरखर्च भागवितानाच नागरिकांची दमछाक होत आहे. त्यात दिवाळीसाठी होणाऱ्या अतिरिक्त खर्चाची भर पडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
काही वस्तूंचे दर मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती, विविध डाळींचे घटलेले उत्पादन आणि बाजारातील आवकेवर होणारा परिणाम, यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खाद्यतेल, हरभरा डाळ, गूळ, साखर, बेसन, मैदा, रवा व पोहे यांच्या दरवाढीचा परिणाम रोजच्या स्वयंपाकासह दिवाळीच्या फराळावरही होत आहे. उत्पादन आणि बाजारातील आवक कमी राहिल्यास आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करताना खर्चाचे नियोजन करण्याचे आव्हान सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभे राहिले आहे.
दिवाळीच्या फराळात चकली, चिवडा, लाडू, करंजी आणि शंकरपाळे या पदार्थांना विशेष महत्त्व असते. मात्र, खाद्यतेल, बेसन, डाळी, साखर व सुका मेवा महागल्याने घरगुती फराळ तयार करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे यंदा फराळाचे प्रमाण कमी करण्याचा विचार गृहिणींना करावा लागत आहे. वेळेअभावी तयार फराळ खरेदी करणाऱ्या नोकरदार महिलांनाही वाढीव दरांचा फटका बसत आहे. एकीकडे दिवाळीची परंपरा जपण्याची इच्छा, तर दुसरीकडे वाढता खर्च, अशा कात्रीत सामान्य कुटुंबे सापडली आहेत. दिवाळीच्या फराळासाठी चणाडाळ आणि बेसनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, डाळींची आवक घटल्याने व उत्पादन कमी असल्याने दरवाढीचा परिणाम बेसनाच्या किमतीवरही होत आहे. आगामी काळात आवक आणखी घटल्यास दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
खरेदीचा उत्साह कायम, मात्र हात आखडता:
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्य दिसत असले, तरी वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. फराळाचे साहित्य, कपडे आणि भेटवस्तू खरेदी करताना गरजेपुरत्या वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. सणाचा उत्साह कायम असला, तरी वाढत्या खर्चामुळे खरेदीचे नियोजन बदलावे लागत आहे.
  • सामान्य नागरिक






























Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday