दि, २२ अमरावती:
जिद्द, कठोर परिश्रम आणि अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मासोद गावची लेक कुमारी मृण्मयी प्रतापराव कीटुकले हिने लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन होणार करोडपती’च्या हॉटसीटवर मजल मारली आहे. मृण्मयीने मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे केवळ मासोद गावच नव्हे, तर संपूर्ण अमरावती जिल्हा आणि परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
एका अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून येत मृण्मयीने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आणि बुद्धिमत्तेची कसोटी पाहणाऱ्या ‘कौन होणार करोडपती’ या ज्ञानपीठाच्या हॉटसीटपर्यंत धडक दिली. या खेळात तिने आपल्या अफाट ज्ञान आणि चातुर्याचे प्रदर्शन घडवत कठीण प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या यशाने ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मृण्मयीच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यासाठी आणि कीटुकले परिवाराचा गौरव करण्यासाठी नुकतीच तिच्या निवासस्थानी आमदार , प्रवीण तायडे यांनी भेट दिली. याप्रसंगी मृण्मयी आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत व जाहीर अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, "मृण्मयीच्या या ऐतिहासिक यशामागे तिची स्वतःची अफाट जिद्द, मेहनत आणि बुद्धिमत्ता तर आहेच; पण त्यासोबतच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तिचे कुटुंब, त्यांचे प्रोत्साहन, पाठबळ आणि उच्च संस्कार यांचाही अतिशय मोलाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील मुलींमध्ये किती मोठी क्षमता असते, हे मृण्मयीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे."
मृण्मयीने मिळवलेल्या या यशामुळे मासोद गावामध्ये आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण असून, ती भविष्यात यशाची अशीच नवनवी शिखरे गाठून आपल्या गावाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. संपूर्ण परिसरातून मृण्मयीला तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी आणि भविष्यातील स्वप्नांसाठी मनःपूर्वक व अभिरुचीपूर्ण शुभेच्छा दिल्या जात आहेत.

