अमरावती, दि ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 'भारतीय उद्योग क्षेत्र २०४७ : भवितव्य आणि आव्हाने' या मध्यवर्ती संकल्पनेवर येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल सायन्स अँड इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी सेंटर मध्ये ३ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग-अमरावती, अमरावती विभागीय विज्ञान अध्यापक मंडळ आणि डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल सायन्स अँड इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके-गुल्हाने यांच्या हस्ते या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय विज्ञान सल्लागार राजेश मनवर उपस्थित होते.
विज्ञान मेळाव्यात सहभागी अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 'भारतीय उद्योग क्षेत्र २०४७ : भवितव्य आणि आव्हाने' विषयावर विचार मांडले व बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा उत्तीर्ण केली. या दोन्ही गुणांच्या आधारे राज्यस्तरीय मेळाव्याकरिता शेगाव येथील सेंट झेवियर हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी भारसाकडे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर परतवाडा येथील सॅक्रेड हार्ट स्कूलच्या दिव्यांशू खंडेजोड याने द्वितीय क्रमांक पटकाविला तर अमरावती येथील स्कूल ऑफ स्कॉलरशिप अवनीश बावस्कर ने उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले.