अंगणवाडीतील पोषण आहाराच्या गुणवत्तेसाठी काटेकोर तपासणी करा -मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 29, 2026

अंगणवाडीतील पोषण आहाराच्या गुणवत्तेसाठी काटेकोर तपासणी करा -मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

 ·        बालकांच्या पोषणाला सर्वोच्च प्राधान्य

 

मुंबई, दि. २९ : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमार्फत बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पोषण आहाराच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत पोषण आहाराची काटेकोर तपासणी व्हावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्री आदिती तटकरे यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेल्या सर्व सेवांचा व उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. या बैठकीस महिला बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि. रा. ठाकूर, सहआयुक्त संगीता लोंढे यांच्यासह महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,
पोषण आहार हा बालकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याने त्याची गुणवत्ता, योग्य स्थिती आणि लाभार्थ्यांना स्वीकारार्हता यामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये. 

बालकांचे उत्तम पोषण व आरोग्य हे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रमुख ध्येय आहे. हे साध्य करण्यासाठी पुरवण्यात येणारा पोषण आहार सर्वोत्तम दर्जाचा असावा यासाठी संपूर्ण यंत्रणेने सतर्क व कार्यरत राहावे असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भारतीय खाद्य निगम (FCI) प्रशासनासोबत संवाद साधून सदर आहार ६ महिने ते ६ वर्षांच्या बालकांना देण्यात येत असल्याने अतिरिक्त काळजी घ्यावी. अंगणवाडी सेविकांनी केंद्रात पोषण आहार स्वीकारताना दर्जाची खात्री करूनच स्वीकारावा. टीएचआर प्राप्त झाल्यानंतर त्याचे तातडीने लाभार्थ्यांना वितरण करावे. लाभार्थ्यांच्या अनुपस्थितीमुळे पोषण आहार शिल्लक राहिल्यास कालबाह्य होण्यापूर्वी वितरण करावे. आहाराबाबत तक्रार असल्यास अंगणवाडी सेविकेने मुख्यसेविकेच्या माध्यमातून प्रकल्प अधिकाऱ्यांना कळवावे. तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी तत्काळ अंगणवाडी केंद्रास भेट देऊन शहानिशा करावी असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले. 

तसेच पोषण आहार पुरवठादारांना ही पोषण आहाराचा पुरवठा निर्धारित वेळेत करावा, आहाराचा पुरवठा करण्यापूर्वी तपासणी करून घ्यावी, आहाराचा पुरवठा करताना स्वच्छ करून व मोजून द्यावा, एफसीआय कडून मिळणारे धान्य स्वच्छ करून पॅक करावे, तक्रार प्राप्त झाल्यास दोन दिवसांच्या आत आहार बदलून द्यावा, तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पुरवठादाराने आपला प्रतिनिधी अंगणवाडी केंद्रात पाठवावा व याबाबत आयुक्त कार्यालयास माहिती द्यावी. पुरवठा करताना त्या आहाराची किमान ८०% कालमर्यादा शिल्लक असावी. टीएचआर पुरवठा करताना दर्जा, प्रोटीन्स व कॅलरीज यांची दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages