राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या विविध योजनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 29, 2026

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या विविध योजनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


        अमरावती, दि. २९ : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण, कोलकाता यांच्या समान (Matching) व असमान (Non-Matching) निधी योजनांतर्गत सन २०२६-२७ साठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील प्रस्ताव संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

            ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या माध्यमातून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनांचे नियम, अटी तसेच अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुक ग्रंथालयांनी तेथून अर्ज डाउनलोड करून भरावेत.

        सन २०२६-२७ साठी समान निधी (Matching) योजनेअंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल २५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. या योजनेव्यतिरिक्त इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येणार असल्याने त्या योजनांसाठी प्रस्ताव सादर करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

        असमान निधी (Non-Matching) योजनांमध्ये ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर खरेदीसाठी ४ लाख रुपये तसेच इमारत बांधकामासाठी (प्रस्ताव फक्त एकदाच) १० ते १५ लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. तसेच "ज्ञान कोपरा" विकसित करण्यासाठी २.५० लाख रुपये व विशेष आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

            याशिवाय ग्रंथालयांच्या ५०, ६०, ७५, १००, १२५ आणि १५० व्या महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ६.२० लाख रुपये तसेच इमारत विस्तारासाठी १० लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध आहे. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग आणि जनजागृती कार्यक्रमांच्या आयोजनासाठी १.५० लाख, २.५० लाख व ३ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असून "बालकोपरा" स्थापन करण्यासाठी कमाल ६.८० लाख रुपये अर्थसहाय्याचा लाभही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

            वरील योजनांपैकी कोणत्याही एका योजनेसाठी इच्छुक ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत प्रस्ताव चार प्रतींमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावेत. तसेच हे प्रस्ताव राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाणाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही सादर करणे आवश्यक आहे.

            योजनांबाबत अधिक माहितीसाठी www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages