श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिंदू स्मशानभूमीच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला निवेदन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, August 17, 2026

श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिंदू स्मशानभूमीच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला निवेदन

 

“स्मशानभूमीच्या मूलभूत सुविधांसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी"

ब्राम्हणवाडा थडी (विलास खाजोने): दिनांक १८

                गावातील हिंदू स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे ग्रामपंचायतीचे लक्ष वेधत श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्मशानभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मूलभूत सुविधांची मागणी करणारे निवेदन ग्रामपंचायतीला देण्यात आले. नागरिकांना अंत्यविधीच्या प्रसंगी गैरसोयींचा सामना करावा लागू नये आणि प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतरही सन्मानजनक अंत्यसंस्काराची सुविधा मिळावी, यासाठी स्मशानभूमीचा तातडीने कायापालट करण्याची मागणी संस्थेने केली आहे.

गावातील स्मशानभूमी ही प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील अंतिम प्रवासाशी जोडलेली अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची जागा आहे. मात्र, सध्या येथे आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने पावसाळा, उन्हाळा अथवा रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा, अशी ठाम भूमिका संस्थेने घेतली आहे.

संस्थेच्या निवेदनात भव्य व मजबूत प्रवेशद्वार उभारणे, स्मशानभूमीभोवती सुरक्षा भिंत बांधणे, प्रवेशद्वारापासून नदीपर्यंत जाणारा रस्ता तयार करणे, बंद पडलेली हापशी दुरुस्त करून कार्यान्वित करणे, पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, स्मशानभूमीचे काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करणे, आवश्यक डागडुजी व वृक्षारोपण करणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे दगड व इतर अडथळे असल्यामुळे अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता तातडीने मोकळा करून सुस्थितीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देणे हीदेखील अत्यावश्यक मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

स्मशानभूमीच्या परिसराचा योग्य विकास करून तेथे हिंदू देवी-देवतांसह महापुरुष व क्रांतिकारकांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही संस्थेने केली आहे. यामुळे स्मशानभूमी परिसराला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून योग्य स्वरूप प्राप्त होईल, अशी भूमिका संस्थेने मांडली.

“स्मशानभूमी ही विकासकामांच्या यादीतील शेवटची बाब नसून प्रत्येक गावाची मूलभूत गरज आहे. नागरिकांना त्यांच्या अंतिम प्रवासात सन्मानजनक सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून आवश्यक निधी उपलब्ध करून कामांना तातडीने सुरुवात करावी,” अशी मागणी श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेने केली आहे.

तसेच सदर मागण्यांवर ग्रामपंचायतीच्या बैठकीत चर्चा करून तातडीने ठराव घेण्यात यावा व प्रत्यक्ष काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आकाश भाऊ दाभाडे, चेतन पोटे, शिवम सापधारे व वेदांत दारोकर उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages