महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 21, 2026

महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी मुंबईत आयोजन


 


मुंबई दि. २० : महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये 'राज्य महोत्सव म्हणून घोषित केले. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे गणेश मूर्तिकार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्याला उदंड प्रतिसाद लाभला. तसेच येत्या २३ ऑगस्ट रोजी मुंबई, नागपूर, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत भाग घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असून  मर्यादित जागा उपलब्ध आहेत.  प्रवेश शुल्क ३०० रुपये असून सर्व सहभागींना मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती, मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात येणार असून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

यावर्षी राज्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रसोबत देशभरात व जगभरात विविध ठिकाणी जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अत्यंत उत्साहाने व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना देखील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच, त्यांच्या उपक्रमांची दखल शासनातर्फे घेतली जाणार असून, त्यांच्या उपक्रमांना भरघोस बक्षिसांच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील लाभणार आहे.

      

डिजिटल युगात माणसाला मातीशी जोडणारा उपक्रम

गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, ती आपल्या कला, परंपरा आणि सर्जनशीलतेशी जोडलेली आहे. आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता, आपल्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा अनुभव प्रत्येकासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरू शकतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रिनवर व्यस्त राहणाऱ्या हातांना थेट मातीचा स्पर्श व्हावा आणि प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचा आनंद मिळावा, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये पर्यावरणपूरक उत्सवाबद्दल जनजागृती घडवून आणली जाणार आहे.

  

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी या कार्यशाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.  प्रदर्शन हॉल, पहिला मजला, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी  येथे 23 ऑगस्ट 1026 रोजी ही कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेत नाव नोंदणी करण्यासाठी 8779584224 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पु.ल.देशपांडे कला अकादमी, मुंबई यांचेकडून करण्यात येत आहे


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages