अमरावती विभागात 'विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६' मोहिमेचे सुधारित वेळापत्रक जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 27, 2026

अमरावती विभागात 'विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६' मोहिमेचे सुधारित वेळापत्रक जाहीर





अमरावती, दि. २८ : विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या अचूक, अद्ययावत व दोषविरहीत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६' मोहिमेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) सुरज वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण ८ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, १७ ऑगस्ट रोजी मतदार याद्यांचा प्रारूप (मसुदा) प्रसिद्ध केला जाईल. त्यानंतर १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. त्यावरील सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान BLO प्रत्येक घरात जाऊन गणना प्रपत्र भरून घेतील. यामध्ये मतदाराची सध्याची माहिती, पूर्वीच्या SIR यादीशी जुळवणी, जन्मतारीख तसेच मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक (ऐच्छिक) नोंदविण्यात येईल. प्रपत्रावर मतदार किंवा कुटुंबातील प्रौढ सदस्याची स्वाक्षरी आवश्यक असून भरलेल्या प्रपत्राची प्रत मतदाराला देण्यात येईल.

गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास BLO संपर्कासाठी सूचना ठेवतील. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास आणखी दोन वेळा भेट दिली जाईल. सलग तीन भेटींमध्ये मतदार अनुपस्थित, स्थानांतरित किंवा उपलब्ध न झाल्यास त्याचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केले जाणार नाही.
मागील यादीशी जुळवणी न झाल्यास किंवा माहितीमध्ये विसंगती असल्यास जन्म दाखला, पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र, कायमस्वरूपी निवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, PPO, वनहक्क प्रमाणपत्र, जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र, कुटुंब नोंदवही तसेच ओळखीसाठी आधार कार्ड यांसारख्या वैध कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करता येणार आहे. समतुल्य शासकीय अथवा शैक्षणिक कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

नागरिकांना voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा ECINET Voter Helpline App द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध असून 'Book a Call' पर्यायाद्वारे BLO भेटीची वेळही निश्चित करता येईल. मात्र, ऑनलाईन अर्ज भरला असला तरी BLO मार्फत प्रत्यक्ष गृहभेट व पडताळणी अनिवार्य राहणार आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर फॉर्म-६ भरून मतदार नोंदणी करता येणार आहे.
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणे हा गुन्हा असून चुकीची माहिती दिल्यास दंड व कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्या वास्तव्यास असलेल्या पत्त्यावरच माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुपस्थित, स्थानांतरित, मृत किंवा दुबार नावे असलेल्या मतदारांची यादी कारणांसह सार्वजनिक नोटीस बोर्ड, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना तसेच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
दरम्यान, SIR मोहिमेच्या नावाखाली येणाऱ्या बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत OTP, बँक खात्याची माहिती किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. भारत निवडणूक आयोग किंवा स्थानिक प्रशासनाकडून या प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून नागरिकांनी केवळ आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती अथवा BLO, AERO आणि ERO यांच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.
                                                                                                                                          ०००००

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages