प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026-27 साठी नोंदणी सुरू; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 13, 2026

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026-27 साठी नोंदणी सुरू;


31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. १३(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम सन 2026-27 करिता शेतकरी सहभागास सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यासाठी 'इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी'ची निवड करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून संरक्षण देणाऱ्या या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 आहे.

पीकनिहाय प्रति हेक्टर शेतकरी हिस्सा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे: भात (तांदूळ) 650 रुपये (विमा संरक्षित रक्कम 65 हजार), खरीप ज्वारी 660 रुपये (विमा संरक्षित रक्कम 33 हजार), सोयाबीन 1 हजार 250 रुपये (विमा संरक्षित रक्कम 62 हजार 500), मूग 594 रुपये (विमा संरक्षित रक्कम 29 हजार 700), तूर 940 रुपये (विमा संरक्षित रक्कम 47 हजार), कापूस 975 रुपये (विमा संरक्षित रक्कम 65 हजार) आणि मका 800 रुपये (विमा संरक्षित रक्कम 40 हजार). सी.एस.सी. केंद्रांमार्फत अर्ज करताना या निश्चित रकमेपेक्षा अतिरिक्त पैसे घेतल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयाकडे तक्रार करावी. अखेरच्या दिवसांत पीक विमा पोर्टलवर तांत्रिक लोड येण्याची शक्यता असल्याने, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी तातडीने जवळच्या सी.एस.सी. केंद्राशी संपर्क साधून विमा काढावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेआवाहन तालुका कृषी अधिकारी पी. डी. गुल्हाने यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages