Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ऐतिहासिक! २० वर्षांच्या आर प्रज्ञानंदने 'नॉर्वे चेस २०२६' जिंकून रचला इतिहास



अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू!
दि. ६ जून:- 
भारताचा २० वर्षांचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने ऑस्लो येथे पार पडलेल्या जागतिक दर्जाच्या 'नॉर्वे चेस २०२६' स्पर्धेत विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. हे प्रतिष्ठेचे जेतेपद मिळवणारा तो पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. 
अंतिम (१० व्या) फेरीत जेतेपद मिळवण्यासाठी प्रज्ञानंदला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना त्याने कमालीचा संयम आणि आक्रमकता दाखवत जर्मनीच्या अव्वल क्रमांकाच्या व्हिन्सेंट किमर चा पराभव केला. या विजयासह त्याला पूर्ण ३ गुण मिळाले आणि त्याने एकूण १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. 
अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो  हा शेवटच्या फेरीपूर्वी आघाडीवर होता, परंतु त्याचा सामना अनिर्णित राहिल्याने तो १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आणि प्रज्ञानंदचा विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाला. 
या स्पर्धेची सुरुवात प्रज्ञानंदसाठी खूप आव्हानात्मक होती. पहिल्या ६ सामन्यांपैकी ३ क्लासिकल सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु, त्यानंतर त्याने सलग ४ क्लासिकल सामने जिंकून (4-Game Winning Streak) बुद्धीबळ विश्वाला अचंबित केले. त्याने अनुक्रमे अलिरेझा फिरौझा, मॅग्नस कार्लसन, विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश आणि शेवटी व्हिन्सेंट किमर यांना पराभवाची धूळ चारली. 
 जगातील नंबर १ मॅग्नस कार्लसनला एकाच स्पर्धेत दोनदा नमवले! 
या स्पर्धेतील सर्वात मोठा हायलाईट म्हणजे प्रज्ञानंदने पाच वेळच्या जागतिक विजेत्या आणि जगातील नंबर १ खेळाडू मॅग्नस कार्लसन चा त्याच्याच मायभूमीत एकाच स्पर्धेत दोनदा पराभव केला. 
त्याने कार्लसनला एकदा पांढऱ्या आणि एकदा काळ्या मोहऱ्यांनी क्लासिकल फॉरमॅटमध्ये पराभूत केले.
गेल्या १९ वर्षांत एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कार्लसनला दोनदा पराभूत करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २००७ मध्ये भारताचे महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी अशी कामगिरी केली होती. 
 अंतिम गुणतालिका (Norway Chess 2026 Open):
क्रमांक खेळाडूचे नावदेशएकूण गुण
आर प्रज्ञानंद (विजेता)🇮🇳 भारत१८
वेस्ली सो🇺🇸 अमेरिका१७
अलिरेझा फिरौझा🇫🇷 फ्रान्स१५.५
 महिला गटात कझाकस्तानच्या बिबिसारा अस्सौबायेवाने १६.५ गुणांसह 'नॉर्वे चेस महिला २०२६' चे विजेतेपद जिंकले.
प्रज्ञानंदच्या या अभूतपूर्व यशामुळे जागतिक बुद्धिबळाच्या नकाशावर भारताचे नाव पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी कोरले गेले असून, त्याच्या या कामगिरीबद्दल देशभरातून आणि क्रीडा जगतातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments