अमरावती, दि.८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत, प्रशासनाने एका अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखून तिचे भविष्य वाचविले आहे. 5 मे 2026 रोजी चाईल्ड हेल्पलाईन (1098) आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती शहरात लावला जाणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळाली होती. या माहितीच्या आधारे यंत्रणांनी तातडीने तपास केला असता, संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाने हा विवाह ठरविला होता. पथकाने बालिकेच्या घरी धाड टाकली तेव्हा तेथे साखरपुड्याचा कार्यक्रम आणि विवाहाची तयारी जोरात सुरू होती. सुरुवातीला नातेवाईकांकडून काही प्रमाणात विरोध झाला, मात्र बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देऊन आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर वातावरण निवळले.
संबंधित बालिकेला ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून, सध्या तिला संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले आहे. तसेच पालकांकडून भविष्यात बालविवाह न करण्याबाबत लेखी हमीपत्र घेण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात असे प्रकार आढळल्यास त्वरित १०९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी केले आहे. तसेच बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments