Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मेळघाटातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध;


जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट


अमरावती, दि१४(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :   मेळघाटातील आरोग्य सुविधा अधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केला.

 नुकतेच जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी धारणी तालुक्यातील सलोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट देऊन तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र नाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव कंकाळ,  डॉ. शिरसाठ उपस्थित होते.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी संपूर्ण आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेची तपासणी केली. त्यांनी औषध भांडारातील साठ्याची आणि औषधांच्या मुदतीची जातीने खात्री करून घेतली. प्रसूती गृहातील सर्व वैद्यकीय उपकरणे सुस्थितीत आणि कार्यान्वित असल्याचे पाहिले. तसेच, वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी प्रत्यक्ष जनरेटर चालू करून त्याची पडताळणी केली. कनिष्ठ सहाय्यक कार्यालयातील कागदपत्रांचे विविध रंगांच्या फाईल्समध्ये केलेले योग्य वर्गीकरण पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले.

आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवासस्थानांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी तातडीने अहवाल जिल्हा कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देत त्यांनी ही दुरुस्ती लवकरच करून दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यांनी १०२ रुग्णवाहिका चालकांना सूचना दिल्या की, रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे हे प्राथमिक कर्तव्य असून रुग्णांकडून पैशांची कोणतीही मागणी केल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच कुपोषित बालकांवर स्थानिक स्तरावर उपचार व्हावेत, यासाठी बालउपचार केंद्रात आवश्यक बेडची व्यवस्था करून हे केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

                                                                                  *****

Post a Comment

0 Comments