जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार
*दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार
अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने 'पीएम राहत' ही योजना सुरू केली आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, अपघातग्रस्तांना आता दीड लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळणार आहेत.
योजनेतून तात्काळ कॅशलेस उपचार केले जातील. यात अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त 7 दिवसांपर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील. अपघातानंतरचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पैशांअभावी उपचार थांबू नये, यासाठी ही योजना राबविण्यात आहे. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची सक्ती करण्यात आलेली नाही. यातील उपचारासाठी होणारा खर्च 'मोटार वाहन अपघात निधी' मधून केला जाणार आहे.
जिल्ह्यातील 40 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेता येईल. ही योजना यशस्वी करण्यासाठी रुग्णालय, पोलीस विभाग, राज्य आरोग्य संस्था आणि आपत्कालीन सेवा यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments