*श्रद्धेचा बाजार आणि राजकारणाची सावली* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, March 31, 2026

*श्रद्धेचा बाजार आणि राजकारणाची सावली*

 

दि. १ एप्रिल :- 

*धर्माच्या नावाखाली उभी राहिलेली बुवाबाजीची व्यवस्था आणि लोकशाहीसमोरील आव्हान*


भारतीय समाजात धर्म आणि अध्यात्म यांची दीर्घ परंपरा आहे. श्रद्धा, संस्कार आणि नैतिक मूल्यांवर आधारित ही परंपरा समाजाला आधार देणारी मानली जाते. मात्र या श्रद्धेचाच गैरफायदा घेत काही तथाकथित “बाबा” आणि “गुरू” यांनी धर्माच्या नावाखाली बुवाबाजीचा एक मोठा बाजार उभा केला आहे. लोकांच्या भीती, असुरक्षितता आणि वैयक्तिक समस्यांचा फायदा घेत चमत्कार, तंत्र-मंत्र आणि दैवी शक्तींच्या नावाने प्रभाव निर्माण केला जातो. अधिक चिंताजनक बाब म्हणजे अनेकदा या बुवाबाजीमागे राजकीय संरक्षण आणि सामाजिक उदात्तीकरणही उभे असल्याचे दिसून येते.
भारतात यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना चर्चेत आल्या आहेत. चंद्रास्वामी आणि सत्यसईबाबा यांची नावे त्यात वारंवार घेतली जातात. तंत्र-मंत्र, चमत्कार आणि अलौकिक शक्तींच्या दाव्यांमुळे त्यांनी मोठा प्रभाव निर्माण केला. त्यांच्या भोवती मोठा भक्ताचा गट तयार झाला आणि अनेक राजकीय नेते, उद्योगपती व प्रभावशाली व्यक्ती त्यांच्याशी जोडल्या गेल्या. या प्रभावामुळे त्यांच्या विरोधातील अनेक गंभीर आरोप असूनही अनेक प्रश्न पूर्णपणे उघडकीस आले नाहीत.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने हा जुना पॅटर्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. धर्म, अध्यात्म, बुवाबाजी आणि राजकारण यांच्यातील एक धोकादायक संबंध या प्रकरणातून स्पष्ट दिसतो. समाजातील भीती, वैयक्तिक समस्या आणि कौटुंबिक अडचणींचा फायदा घेत लोकांना जाळ्यात ओढणे, त्यांच्या श्रद्धेचा वापर करून मानसिक नियंत्रण मिळवणे आणि त्यानंतर आर्थिक तसेच लैंगिक शोषण करणे—ही प्रक्रिया अनेक अशा घटनांमध्ये दिसून येते.
या प्रकारातील महत्त्वाची बाब म्हणजे अशा घटनांमध्ये दोष केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. त्यामागे अनेकदा एक संपूर्ण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जाळे कार्यरत असते. “दैवी शक्ती”चा दावा करणारे हे बुवा हळूहळू समाजातील प्रभावशाली घटकांशी संबंध निर्माण करतात. या संबंधांमुळे त्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळते आणि त्यांचा प्रभाव वाढत जातो. परिणामी, श्रद्धेच्या आधारावर उभे राहिलेले हे केंद्र हळूहळू सत्तेच्या आणि स्वार्थाच्या जाळ्यात रूपांतरित होते.
या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात मोठे बळी ठरतात ते म्हणजे स्त्रिया. समाजरचनेत आधीच असमानता आणि असुरक्षिततेचा सामना करणाऱ्या स्त्रिया अशा बुवाबाजीसाठी सर्वात सोपे लक्ष्य ठरतात. संकटातून मार्ग काढण्यासाठी गेलेल्या अनेक स्त्रिया आणखी मोठ्या संकटात अडकतात. कधी औषध देऊन, कधी ब्लॅकमेल करून, तर कधी कुटुंबीयांना धमक्या देऊन त्यांचे शोषण केले जाते. सामाजिक बदनामीची भीती आणि कुटुंबावर होणाऱ्या परिणामामुळे अनेक महिलांना पुढे येणे कठीण जाते.
या पार्श्वभूमीवर समाजाने आणि राज्य व्यवस्थेने गंभीर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद आणि विचारस्वातंत्र्य विकसित करण्याचे कर्तव्य सांगते. तरीही प्रत्यक्षात समाजात आणि राजकारणात बुवा, बाबा, ज्योतिषी आणि मांत्रिक यांच्या प्रभावाचे चित्र दिसते. ही विसंगती दूर करणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे.
राजकारण्या नेही  या वास्तवाकडे प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे. बुवा-बाबांच्या छायेतून बाहेर येत लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर आधारित, वैज्ञानिक दृष्टिकोनावर उभे असलेले प्रगतिशील आणि उत्तरदायी राजकारण उभे करणे ही काळाची गरज आहे.
धर्म समाजाला नैतिक आधार देण्यासाठी असतो; परंतु जेव्हा श्रद्धा विवेकशून्य बनते आणि सत्तेच्या सावलीत येते, तेव्हा तीच श्रद्धा शोषणाचे साधन बनते. म्हणूनच श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल राखत समाजाने जागरूकतेचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. अन्यथा श्रद्धेचा हा बाजार आणि सत्तेची सावली लोकशाहीसाठी गंभीर आव्हान ठरू शकते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages