तळवेल गावातील ३४० कुटुंबांना मालमत्ता पत्रकाचा मार्ग मोकळा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 25, 2026

तळवेल गावातील ३४० कुटुंबांना मालमत्ता पत्रकाचा मार्ग मोकळा




आमदार प्रवीण तायडे यांच्या पुढाकाराने महसूल विभाग हालचाल

ब्राम्हणवाडा थडी(विलास खाजोने)दि.२६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे यांच्या कुशल कौशल्यामुळे तळवेल गावातील वाढीव गावठाण व नजुलशीट प्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मालमत्ता पत्रक (PR कार्ड) प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तळवेल गावातील सुमारे ३४० कुटुंबांना मालमत्ता पत्रक नसल्यामुळे शासकीय घरकुल योजना, विविध अनुदाने तसेच खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत होता.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार प्रवीण तायडे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत संबंधित प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वाढीव गावठाणाची नजुलशीट तयार करून पात्र कुटुंबांना मालमत्ता पत्रक वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

३० ते ४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न

तळवेल गावात सुमारे ९१८ कुटुंबे वास्तव्यास असून त्यापैकी ३४० कुटुंबांकडे अद्याप मालमत्ता पत्रक नाही. १९८६ साली इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत अनेक कुटुंबांना ३०×३० जागांचे वाटप झाले होते. मात्र संबंधित जागांची अधिकृत नोंद व PR कार्ड तयार न झाल्याने वारसाहक्क, बक्षीसपत्र, मृत्युपत्र किंवा खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.

२०१७ पूर्वी स्टॅम्प पेपरवर नोटरी करून ग्रामपंचायतीमध्ये नोंदी घेतल्या जात होत्या. मात्र कायद्यातील बदलांनंतर ही प्रक्रिया बंद झाल्याने अनेक व्यवहार प्रलंबित राहिले आहेत. परिणामी संबंधित कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित राहिली आहेत.

प्रशासनाला दिल्या तातडीच्या सूचना

आमदार प्रवीण तायडे यांनी जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख विभाग तसेच तहसील कार्यालयाशी समन्वय साधून तळवेल येथील वाढीव गावठाण प्रकरण तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रक देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.

ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना

गावकऱ्यांनी आमदारांच्या पुढाकाराचे स्वागत करत लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “आमच्या हक्काची जागा आमच्या नावे व्हावी आणि आम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा,” 

अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

तळवेल गावातील हा दीर्घकालीन प्रश्न निकाली निघाल्यास शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील अशा प्रलंबित प्रकरणांसाठीही हा एक आदर्श ठरणार आहे. आणि प्रस्थापित 20 वर्षापासून राज्य करणाऱ्या राजकारण्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे तळवेल येथील नागरिकांचे मत होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages