माई सिंधुताई सपकाळ माझ्यासाठी आदर्श होत्या
माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई गवई यांचे प्रतिपादन
सावित्रीबाई फुले जयंती व सिंधुताई सपकाळ पुण्यतिथीनिमित्त चिखलदरात करुणेचा जागर
माईंच्या आठवणींनी डोळे पाणावले, समाजसेवेची नवी शपथ
चिखलदरा, दि. ६ जानेवारी / (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ) : “सिंधुताई माझ्यासाठी केवळ समाजसेविका नव्हत्या, त्या माझ्या आयुष्याचा आदर्श होत्या. समाजातील निराधार लेकरांसाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य झिजवले. त्यांच्या डोळ्यांत माणुसकी होती आणि हृदयात अमाप करुणा होती. त्या आज नाहीत, पण त्यांच्या विचारांनी मला आजही काम करायला भाग पाडले आहे.” “माई ज्या भावनेतून मेळघाटात आल्या, ज्या दुर्गम भागातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले, ती ठिणगी आज मोठ्या ज्वालासारखी पेटलेली आहे. माईंचे स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही, हीच आजची खरी श्रद्धांजली आहे,” असे माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई गवई यांनी ठाम शब्दांत सांगितले. मार्गदर्शन करताना डॉ. कमलताई रामकृष्ण गवई यांचा स्वरही भावनांनी भरून आला.
माईंच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आणि सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून, पद्मश्री सौ. सिंधुताई सपकाळ जनविकास सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे शाखा चिखलदरा यांच्या वतीने आयोजित पुष्पांजली कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम नव्हता, तर माईंच्या आठवणींनी भरलेला एक भावनिक प्रवास ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री व माजी लेडी गव्हर्नर आचार्य डॉ. कमलताई रामकृष्ण गवई होत्या. सावित्रीबाई फुले आणि सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताच संपूर्ण सभागृह क्षणभर स्तब्ध झाले. जणू माई स्वतः तिथे उपस्थित असल्याचा भास उपस्थितांना होत होता. त्या बोलतांना पुढे म्हणाल्या की, 'चिखलदरा ही माईंची कर्मभूमी. इथूनच त्यांनी आदिवासी मुलींसाठी पहिली आश्रमशाळा सुरू केली. जिथे शिक्षणाचा प्रकाश कधी पोहोचलाच नव्हता, तिथे माईंनी आशेचा दिवा लावला. आजही त्या शाळेतून शिकणाऱ्या मुली माईंच्या स्वप्नाची साक्ष देत आहेत. यावेळी माईंचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ यांनी भावूक होत सांगितले, “आई शारीरिक स्वरूपात आज आमच्यात नाही, पण तिचे कार्य पुढे नेणे हीच माझी जबाबदारी आहे. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आईचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.” या कार्यक्रमात जिल्हा सत्र न्यायाधीश प्रभाकर मोडक, माजी आयकर आयुक्त पियुष कोल्हे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माईंच्या मातृत्व, संघर्ष आणि समाजसेवेवर मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार केवलराम काळे, नागपूरचे माजी आ. प्रभूदास भिलावेकर, गुगामल राष्ट्रीय उद्यानाच्या उपवनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे, वॉरंट ऑफिसर एअर फोर्स सुनील मानकर, नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, अभिमान डोईजड, धर्मराज खडके, राजू करंडे, मार्तंड नेवासकर, जेष्ठ पत्रकार मोहम्मद अश्रफभाई, अधीक्षिका सरिता सपकाळ, प्रसाद सपकाळ, सौ. जान्हवी सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.दोन दिवसीय कार्यक्रमात वक्तृत्व, कविता वाचन, गीत गायन, अनुभव कथन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने हेलावून टाकली. सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणातील योगदान आणि सिंधुताईंच्या संघर्षमय आयुष्याचा संदेश प्रत्येक मनात खोलवर रुजला.
चौकट
चिखलदरातून सिंधुताईंच्या विचारांचा अखंड प्रवास सुरूच...
माई गेल्या, पण माईंची माया अजून जिवंत आहे, चिखलदरातून सिंधुताईंच्या विचारांचा अखंड प्रवास सुरूच आहे. माई सिंधुताई सपकाळ आज हयात नाहीत, पण ज्या हातांनी त्यांनी अनाथांना मायेची ऊब दिली, ती ऊब आजही जिवंत आहे. माई गेल्या नाहीत, त्या हजारो लेकरांच्या हसण्यात, शिक्षणात आणि माणुसकीत आजही जिवंत आहेत. त्यांचे कार्य चालू आहे आणि तेच समाजासाठी आशेचे खरे दालन आहे, अशी भावना या कार्यक्रमात उमटली. काळाच्या पडद्याआड गेलेली एक माणुसकी आजही जिवंत आहे. आई नसतानाही हजारो लेकरांना मायेसारखी कवेत घेणारी पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) आज हयात नाहीत. पण ज्या हातांनी त्यांनी अनाथांच्या अश्रूंना पुसले, त्या हातांचे कार्य आजही थांबलेले नाही. माईंचे शरीर नाही, पण त्यांची माया, त्यांचे विचार आणि त्यांचे स्वप्न आजही चिखलदरातून समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचत आहे.
Post a Comment
0 Comments