राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२५-२६चे अमरावती येथे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, December 16, 2025

राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२५-२६चे अमरावती येथे आयोजन




 

अमरावती, दि. १७ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ व १९ वर्ष मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ चे आयोजन दि. १७ ते २० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गुरूवार, दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

 

जिल्हा क्रीडा संकुलाच्या खेलो इंडिया आर्चरी आंतरराष्ट्रीय रेंजवर स्पर्धा होणार आहे. राज्यातील ८ महसूल विभाग आणि १ क्रीडा प्रबोधिनी, पुणे अशा एकूण ९ विभागांतील १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी सुमारे ४८५ खेळाडू, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य ऑलिम्पीक संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित राहतील. उद्घाटन समारंभात आर्चरी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके, मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदिप भोगे, मधुरा धामणगांवकर, पुर्वशा शेंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

निवड समिती इंडियन, कंपाऊंड व रिकर्व्ह या क्रीडा प्रकाराचे निरीक्षण करून महाराष्ट्र राज्याच्या १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या संघाची निवड करतील. महाराष्ट्र राज्याचा संघ दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी घोषित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या संघातील खेळाडू झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना आकर्षक मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages