नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 29, 2025

नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार



*पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी आणि घाट रस्त्यावरील संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियमात अंशत: बदल केले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, बुधवार (31 डिसेंबर 2025) ते गुरुवार (1 जानेवारी 2026) या कालावधीत चिखलदरा मार्गावर 'वन-वे' (एकमार्गी) वाहतूक लागू करण्यात आली आहे.

चिखलदऱ्याकडे येणारा परतवाडा ते चिखलदरा हा रस्ता अरुंद आणि तीव्र घाटाचा असल्याने अपघाताची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने चिखलदऱ्याला जाण्यासाठी आणि परतण्यासाठी वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. नवीन नियमानुसार, पर्यटकांना चिखलदऱ्याला जाताना परतवाडा-धामणगाव गढी-चिखलदरा या मार्गाचा वापर करावा लागेल. तर पर्यटनानंतर परत येताना चिखलदरा-घटांग-परतवाडा या एकमार्गी रस्त्यानेच खाली उतरावे लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना या नियमातून सवलत देण्यात आली आहे. मात्र, इतर पर्यटकांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर मोटार वाहन अधिनियम, 1988 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 नुसार कारवाई करण्यात येईल. चिखलदऱ्यातील कडाक्याची थंडी आणि पर्यटकांचा ओघ पाहता जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages