महान तपस्वी श्री संत मारुती महाराज उर्फ घंटी वाले बाबा - पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवी वर्ष विशेष लेखपुष्प - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, December 30, 2025

महान तपस्वी श्री संत मारुती महाराज उर्फ घंटी वाले बाबा - पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवी वर्ष विशेष लेखपुष्प




चांदूरबाजार , दि.३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):- 

नमस्कार माझा मारोती पदाला-

विदर्भ भूमी ही प्राचीन काळापासूनच  ऋषी,मुनी, संत, महंत,सिद्ध,ऋषी, साहित्यिक, सुधारक,संशोधक, विद्वान, पंडित आणि योग भ्रष्ट महात्मे,यांचे माहेरघर असलेली भूमी आहे. दंडकारण्यातील उत्तरेकडील सातपुडा पर्वताचा  पायथा तर  अनेक ऋषिकुलांची  आश्रम स्थली होती. अगस्ती ऋषींच्या आगमनानंतर  अनेक सिद्धांना  तर या भूमीने आकर्षित केले

महामुनी मार्कंडेय,कारिंज ऋषी, दैत्यगुरु शुक्राचार्य, दधीची, पिंपलाद,मदालसा,आदी शेकडो ऋषींच्या वास्तव्याने  ह्या कुंजर पर्वताची पुराणांनी पुण्यकीर्ती   !महामुनीनिवास पवित्रिता !म्हणून  गायलेली आहे.

येथील भैरवपीठ, पूर्णापीठ, शैलपीठ ही अध्यात्म विद्यांची   शक्ती केंद्र होती. वर्तमानातील बहिरम मुक्तागिरी सालबर्डी  ही तीर्थक्षेत्रे  व तेथील तीर्थदेवता  प्राचीन मानवी सभ्यतेची साक्षीदार आहेत.

या  सुजलाम सुफलाम परिसराने  मानवसमूहाला  संशोधन,मानवीयतेची शिक्षा, धर्म संस्कार,  देऊन  नागर वसाहती वाढविल्यात. त्यामुळेच चिखलदरा,अचलपूर, करजगाव,चा. बा.,रिद्धपूर, मोर्शी, काटोल इ नगरे, मोठाल्या बाजारपेठा निर्माण झाल्यात. मात्र आध्यात्मिक उगमस्थाने मात्र काळाने व  सततच्या  परकीय आक्रमणाने उध्वस्त केलीत..... पवित्र देवालये, ऋषींची आश्रमस्थाने, काळाच्या पडद्याआड झालीत.

कायमची नष्ट मात्र झाली नाहीत. कालाच्या संगतीत  शेकडो गावामध्ये  शेकडो संत,महात्मे, सिद्ध,मुनी अवलिया, योगभ्रष्ट महापुरुष     वारंवार अवत्तीर्ण झालेत आणि ह्या पुण्यभूमीचे तपोबल कायम ठेवले. ब्रह्मविद्येचा  नंदादीप कोणत्या ना कोणत्या संत परंपरेने  अखंड तेवत ठेवला.

याच भूमिचे महान तपस्वी शिवावतार श्री संत मारुती महाराज हे या शताब्दीतील  सकल संत परंपरेचे तेजपून्ज तापहीन मार्तंड म्हणून शोभायामान आहेत. परमार्थिक ऐश्वर्या वाढावे यासाठी  घंटी वाले बाबा यांनी -

धरी स्कंधी त्रिशूळ कानात कवडी!

 शिखाभार अलपी पायात बेडी!

 गळा रुद्रमाळा शिव स्मात झाला!

 प्रणिपात माझा मारुती पदाला!!

असे स्वरूप धारण  करून  अखंड शिव आराधन केले.

 श्री संत मारुती महाराज उर्फ घंटीवाले बाबा यांनी आपल्या संपूर्ण जीवन ग्राम स्वच्छता, अन्नदान, धर्मशाळांची निर्मिती, पार्थिव पूजा, महायज्ञांची आयोजने,  धार्मिक उत्सव व भूतदया ठेवून  सर्वत्र समभाव ठेवून  जीवा शिवाच्या ऐक्य भावासाठी आपल्या शंख नादाने व घंटी नादाने  संपूर्ण परिसर संस्कारीत केला.

घरी हाटी मागी जना एक पैसा!

 तयादिव्य लीला सदा कानी ऐका!!

 करी अन्नदाने आणि धर्मशाळा!

 प्रणिपात माझा मारुती पदाला!!

 याप्रमाणेच वंदनीय महाराजांनी  आपले जीवन कार्य व्यतित केले.

 श्री महाराजांचे संपूर्ण जीवन  बघता सातपुड्याच्या परिसरातील   इतिहास -पुराण स्मृतीना उजाळा देण्यासाठीच  त्यांचे अवतरण झाले असावे असे  वाटते.

सन २०२५-२६ हे  ब्रह्मलीन महाराजांच्या निर्वाणाचे  50 वे वर्ष  म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष होय. श्रींच्या शिकवणीचा  प्रचार  प्रसार व पुनर्जागरण होणे हे  औचित्यपूर्ण आहे, आपले कर्तव्य ही आहे. यासाठीच हा लेखन प्रपंच.

श्री संत मारुती महाराज पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवी वर्ष विशेष हि शब्दसुमने त्यांच्याच चरणी समर्पित....

श्री घंटीवाले महाराज कि जय!

✍ लेखन 👏

ह भ प प्रा. श्री श्रीकांत महाराज भुसकडे.(हिरुरकर)

श्री गुलाबराव महाराज संस्थान भक्तीधाम चा. बा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages