Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

धरती आबा जनभागीदारी अभियानांतर्गत माहिती, शिक्षण व संवाद शिबिरांचे आयोजन


अमरावती, दि. १६  : जिल्ह्यातील आदिवासी व आदिम जमातीच्या समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी "धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान" आणि केंद्र सरकारच्या "प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत" विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १५ ते ३० जून या कालावधीत "धरती आबा जनभागीदारी अभियान" राबविण्यात येणार आहे.
या विशेष अभियानांतर्गत धारणी तालुक्यात २३ जून रोजी धारणी, २४ जून रोजी कळमखार आणि २६ जून रोजी सुसर्दा येथे, तर चिखलदरा तालुक्यात १८ जून रोजी सलोना, २४ जून २०२५ रोजी चिखली येथे आणि २६ जून रोजी हतरू येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जनजागृती तथा लाभ वितरण शिबिरे घेण्यात येणार आहेत.
"धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान" आणि "प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान" या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांद्वारे आदिवासीबहुल गावांमध्ये पक्की घरे (प्रधानमंत्री आवास योजना), रस्ते (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना), पाणीपुरवठा (जल जीवन मिशन), घरांचे विद्युतीकरण, नवीन सौरऊर्जा योजना, फिरती आरोग्य पथके (राष्ट्रीय आरोग्य अभियान), आयुष्यमान भारत कार्ड (प्रधानमंत्री जनआरोग्य योजना), एलपीजी कनेक्शन्स (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना), अंगणवाडी केंद्रांची स्थापना (पोषण अभियान), वसतिगृहांची स्थापना (समग्र शिक्षा अभियान) इत्यादी बाबींवर विशेष मोहीम राबवून काम करण्यात येत आहे.
"प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत" जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील एकूण ३ गावांचा समावेश आहे. या अभियानातून उसळगव्हाण येथील १७ आणि बोरगाव धांडे येथील ४ अशा एकूण २१ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यातील २० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, सन २०२५-२६ या वर्षात नायगाव, ता. धामणगाव रेल्वे येथील २० लाभार्थ्यांच्या घरकुल मंजुरीची कार्यवाही सुरू आहे. या गावांमध्ये १०० टक्के आदिम जमातींची आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, किसान सन्मान निधी आणि इतर आवश्यक कागदपत्रे काढण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.
"धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत" जिल्ह्यातील अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा, धारणी, दर्यापूर, धारणी, मोर्शी, वरुड या ९ तालुक्यांमधील ३२१ आदिवासीबहुल गावांचा समावेश आहे. या अभियानातून धारणी प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत २ मुलांचे आणि मुळीचे ४ असे एकूण ६ वसतिगृहांना मंजुरी मिळाली आहे. या अभियानातून, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्यामार्फत आदिवासी लाभार्थ्यांना रस्ते, पाणी, वीज, नेटवर्क, पोषण, आरोग्य आणि विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, आधार, रेशन, जात प्रमाणपत्र यातील त्रुटी शोधून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
भारत सरकारमार्फत अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांसाठी १५ ते ३० जून २०२५ या कालावधीत "धरती आबा जनभागीदारी अभियान" राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत माहिती, शिक्षण व संवादच्या मदतीने एकूण ३२१ गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ पोहोचविण्यात येणार आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात आदिवासी व आदिम जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ थेट पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्रियपणे कार्यरत आहे. "धरती आबा" आणि "पीएम जनमन" अभियानांतर्गत हे कार्य समन्वयाने राबवले जात आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.
नागरिकांनी या शिबिरांना लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी राहुल ठोंबरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments