Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शासकीय तंत्रनिकेतनच्या 267 विद्यार्थ्यांना रोजगार

                          


                                       
*विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध

अमरावती, दि.१७ (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): अमरावती शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. उत्कृष्ट अध्यापन आणि इतर सोयी सुविधांमुळे गेल्या २०२४-२५  या वर्षात उत्तीर्ण झालेल्या २६७  विद्यार्थ्यांना नामांकीत कंपनीत रोजगार मिळाला आहे.

अमरावती शासकीय तंत्रनिकेतन अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९५५ मध्ये झाली आहे. तसेच संस्थेला १९९५ मध्ये शैक्षणिक स्वायत्तता लाभली आहे. संस्थेत स्थापत्य, यंत्र, विद्युत, अणू विद्युत, संगणक, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र, प्लास्टिक पॉलिमर, रसायन या ९ विद्याशाखा असून त्यापैकी ६  एनबीए नामांकन प्राप्त आहेत.

संस्थेचा ६२  एकराचा परिसर असून इमारती, प्रशस्त क्रीडांगणे, तसेच अद्ययावत पुस्तकांनी परिपूर्ण असे सुसज्ज ग्रंथालय आहे. प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणे, यंत्रसामुग्री, रसायने यांनी परिपूर्ण आहेत. संस्थेत उच्चविद्या विभूषित व अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे. तसेच मुलांसाठी एक आणि विद्यार्थिनींसाठी दोन वसतिगृह, इंटरनेट व इतर सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असून दरवर्षी दर्जेदार कंपनीमध्ये मुलाखतीद्वारे बहुसंख्य विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज दिल्या जाते. २०२४-२५  या शैक्षणिक वर्षांत आता पर्यंत एकूण २६७  विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना नामांकीत कंपनीमध्ये निवड होण्याची संधी मिळते. तसेच संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मुलाखतपूर्व मार्गदर्शन आणि रोजगार संधी उपलब्ध व्हावी म्हणून कार्यक्षम प्रशिक्षण व आस्थापना विभाग उपलब्ध आहे. संस्थेत नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटना सक्रीय आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून विविध नामांकीत कंपन्यांमध्ये वरीष्ठ पदावर कार्यरत माजी विद्यार्थीसुद्धा संस्थेतील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांच्या आर्थिक विकासासाठी मोलाचे सहकार्य करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष पाठ्यक्रम संस्थेत लागू केला आहे. द्विभाषिक शिक्षण प्रणाली अवलंब केली आहे.

तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प शुल्क आकारून शिक्षण पूर्ण करण्याची संधी तसेच शिक्षण व परीक्षा शुल्क सवलत दिली जाते. गरीब व पात्र विद्यार्थ्यांसाठी संस्थेकडून ‘नैवेद्य निधी’ योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. भारत सरकार आणि राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. राज्य सरकारच्या योजनेंतर्गत मुलींना १००  टक्के शुल्क माफ केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय सुविधा संस्थेत उपलब्ध आहेत. राज्य शासनाने संस्थेला नुकतेच सेंटर ऑफ एक्सलन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि थ्रीडी प्रिंटिंग या सुविधा दिली आहे. याचा संस्थेतील सर्व विभागातील विद्यार्थी उपयोग घेत आहेत. नवीन तंत्रज्ञानावर विकसित असलेले सर्व मॉडेल्स वापरून विद्यार्थी नवीन प्रोजेक्ट तयार करत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील.

राज्य शासनाच्या सीईटी सेलद्वारे नवीन २०० संगणक असलेले सुसज्ज असे दोन संगणक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आभासी पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून ई-बुक्सद्वारे अभ्यास साहित्य डाऊनलोड करता येते. तसेच संस्था आणि विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येतात.

जिल्हा नियोजन समितीमधून संस्थेच्या सर्व विभागांना २२ स्मार्ट क्लासरूम देण्यात आले आहे. याचा फायदा प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना शिकवणी आणि प्रशिक्षण घेण्यासाठी होत आहे. मेडा कडून १४० केव्ही सौर ऊर्जा रूफ टॉप पॅनल विकसित करण्यात येत आहे. अद्ययावत सोयी सुविधा, दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली शिक्षण प्रणालीयुक्त असलेली शासकीय तंत्र निकेतन ही संस्था उत्कृष्ट अभियंता व औषधंनिर्माणशास्त्रज्ञ घडविण्यात अग्रेसर आहे. तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. अतुल बोराडे यांनी केले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments