बिसलेरी पाण्याचे नमुने दोनदा तपासणीत नापास; FSSAI कडून न्यायालयात खटला चालवण्यास मंजुरी

 


भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) केलेल्या तपासणीत बिसलेरी (Bisleri) कंपनीच्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे नमुने दोनदा चाचणीत असुरक्षित आढळल्याने, कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या नमुन्यांमध्ये कर्करोग (कॅन्सर) आणि किडनीच्या आजारांना निमंत्रण देणारी रसायने आढळल्याचे समोर आले आहे. 

 FSSAI च्या अधिकाऱ्यांनी बाजारातून नव्हे, तर थेट बिसलेरी इंटरनॅशनलच्या गोव्यातील उत्पादन प्रकल्पातून पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते.

 पहिल्या प्रयोगशाळा तपासणीत हे पाणी पिण्यास अयोग्य ठरले. त्यानंतर कंपनीने आक्षेप घेत अपील केल्यानंतर, रेफरल फूड लॅबोरेटरीमध्ये (Referral Food Laboratory) दुसरी चाचणी घेण्यात आली. या दुसऱ्या चाचणीतही नमुने असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

 या अहवालानंतर FSSAI ने रविवारी (२२ नोव्हेंबर २०२६) अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत बिसलेरीविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

पहिल्या तपासणीत पाण्यामध्ये ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त (प्रति लिटर १२ मायक्रोग्रॅम) आढळले. पाण्याचे शुद्धीकरण (ओझोनायझेशन) करताना हे रसायन तयार होते. याच्या दीर्घकाळ सेवनाने किडनीचे आजार आणि कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. 

 रेफरल लॅबच्या दुसऱ्या तपासणीत पाण्यात PAHs हे घटक आढळून आले. हे घटक देखील कर्करोगजन्य (Carcinogenic) मानले जातात आणि शरीरातील अवयवांना इजा पोहोचवू शकतात.

 या बातम्यांनंतर बिसलेरी कंपनीने आपली बाजू स्पष्ट करत कंपनीचे पाणी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, गोव्यातील प्रकल्पातून एकूण ६ नमुने घेण्यात आले होते, त्यापैकी ५ नमुने सर्व गुणवत्ता निकषांवर पात्र ठरले आहेत. केवळ ६ व्या नमुन्याबाबत तांत्रिक तफावत आढळली होती आणि त्यानंतरच्या स्वतंत्र चाचण्यांमध्ये ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेतच असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday