जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन


 

* २६ नोव्हेंबरला लोकगीत, लोकनृत्य व पथनाट्य स्पर्धा

 

अमरावती, दि. २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' संकल्पनेवर आधारीत जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ चे दि. २६ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. विकसित भारत @ २०४७ च्या दृष्टिकोनाशी जोडलेल्या या महोत्सवात १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाकडून NYF-VBYLD २०२७ चे आयोजन केले जाणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये दिल्ली येथे सांस्कृतिक ट्रॅक, विकसित भारत चॅलेंज ट्रॅक, इनोव्हेशन ट्रॅक आणि युवा संसद या चार विभागांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होणार आहेत.

 

त्यानुसार सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून विकसित भारत यंग लिडर्स डॉयलॉग २०२७ चॅलेंज ट्रॅक अंतर्गत निबंध लेखन टप्प्यातून पात्र ठरलेल्या स्पर्धकांची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा होईल. यासाठी 'नावीण्यपूर्ण अर्थव्यवस्था, पर्यटन आणि सर्जनशील उद्योग' हा विषय आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत चित्रकला व कविता लेखन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलातील कॉन्फरन्स हॉल येथे होतील. तसेच गुरूवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत लोकगीत, लोकनृत्य व पथनाट्य स्पर्धा या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे होतील.

 

या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी वय १५ ते २९ वर्षे दरम्यान असलेले युवक-युवती सहभागी होऊ शकतील. जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्माचा दाखला व ओळखपत्रासह आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर प्राविण्य प्राप्त करणाऱ्या संघ आणि कलाकारांना विभाग, राज्य आणि त्यानंतर राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येकस्तरावर यशस्वी ठरणाऱ्यांना शासनाकडून रोख पारितोषिक दिले जाईल.

 

जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक, मार्डी रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष किंवा amravatidso@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. याची एक प्रत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयास सादर करावी.

 

स्पर्धांबाबत अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे– ९९७००७११७२, शेख सलीम शेख हुसेन – ९६५७२७७४५७, क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे– ७०३८०८२६९६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. गणेश जाधव यांनी केले आहे.


أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday