११०० कोटींची थकबाकी; शासनाकडून केवळ २८ कोटींचा निधी उपलब्ध. मोफत डायलिसिस सेवा धोक्यात; गरीब रुग्णांनी उपचारासाठी पैसे आणायचे कुठून?- महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू किडनीविकारग्रस्त रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार देणाऱ्या 'महाडायलिसिस योजने'ला सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून वेळेवर आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने राज्यातील एकूण १०८ महाडायलिसिस केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
- महाडायलिसिस या योजनेअंतर्गत सुमारे ११०० कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शासनाकडून त्यापैकी केवळ २८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून उर्वरित निधी अद्याप मिळालेला नाही. यामुळे केंद्रांचे व्यवस्थापन, आवश्यक वैद्यकीय साहित्याची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यावर गंभीर परिणाम झाला आहे.
- महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा सुरू केली होती. खाजगी रुग्णालयात डायलिसिससाठी मोठा खर्च येत असल्याने सामान्य कुटुंबांना हा खर्च परवडणारा नसतो. या योजनेमुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता.
- डायलिसिस हा किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि नियमितपणे करावा लागणारा उपचार आहे. उपचारांमध्ये खंड पडल्यास रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. केंद्रे बंद झाल्यास रुग्णांना शासकीय रुग्णालये किंवा अधिकृत डायलिसिस केंद्रांची पर्यायी व्यवस्था शोधावी लागेल, जिथे आधीच मोठी प्रतीक्षा यादी आहे. खाजगी रुग्णालयांचा खर्च सामान्य कुटुंबांना पेलवणारा नसल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
- निधीअभावी या केंद्रांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले आहे. या सर्व अडचणींमुळे केंद्रांचे कामकाज सुरू ठेवणे कठीण झाल्याने सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय प्रकल्प व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.
रुग्णाची प्रतिक्रिया (संग्राम खेडकर)
सांगोला तालुक्यातील फुंकगाव येथील किडनीविकारग्रस्त रुग्ण विनोद भागोराव गोरे हे उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात आले होते. मात्र, सेवा बंद असल्याचे समजल्याने त्यांची मोठी निराशा झाली.
"आम्ही गरीब आहोत, खाजगी रुग्णालयात उपचार घेणे आम्हाला परवडणारे नाही. शासनाने तातडीने ही सेवा सुरू करावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रकल्प व्यवस्थापनाने आणि रुग्णांनी शासनाकडे तातडीने थकीत निधी देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सर्व १०८ केंद्रे पुन्हा पूर्णपणे सुरू होतील आणि गरीब रुग्णांचे प्राण वाचतील.
