अमरावती, दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता चांदूर बाजार येथील गोविंदप्रभू मंगल कार्यालय येथे देशव्यापी कृषी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय कार्यालयाचे महाव्यवस्थापक कौशल कुमार काला उपस्थित राहणार आहे. तसेच बँकेचे अमरावती क्षेत्रीय प्रबंधक पन्नम कुमार, नाबार्डच्या जिल्हा विकास व्यवस्थापक रश्मिता पंचाळे उपस्थित राहणार आहेत.
या कृषी कर्ज मेळाव्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध कृषी कर्ज योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पीक कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी गुंतवणूक कर्ज तसेच शेतीपूरक व्यवसायांसाठी उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणीच कर्ज मंजुरी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विमा दाव्यांच्या रकमेचे धनादेश वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा मेळावा शेतकऱ्यांसाठी केवळ कर्जवाटपाचा कार्यक्रम नसून आर्थिक समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून बँकेच्या विविध कृषी कर्ज योजनांचे व्याजदर अत्यंत स्पर्धात्मक व किफायतशीर आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा तसेच शेतीपूरक व्यवसायांसाठी बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा. चांदूर बाजार व परिसरातील शेतकरी, कृषी उद्योजक, कृषीपूरक व्यवसाय करणारे व्यापारी, तसेच इच्छुक कर्जदारांनी या मेळाव्यास उपस्थित राहून बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.