'दुष्काळग्रस्तांच्या पाठीत खंजीर!'



महाराष्ट्रातील दीड कोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम (ऍडव्हान्स) मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा ही अखेर अत्यंत फसवी, पोकळ आणि संतापजनक ठरली आहे. सणासुदीच्या आणि दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाच्या होरपळीत होरपळणाऱ्या बळीराजाच्या जखमेवर मलम चोळण्याऐवजी राज्य सरकारने त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच पाप केले आहे. घोषणा करताना कोणताही गाजावाजा मागे न ठेवणाऱ्या या सरकारने आता मदतीला निकषांचे असे काही जाळे विणले आहे की, बहुतांश शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत. हे सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नसून, त्यांच्या पाठीत ३३ टक्क्यांचा 'खंजीर' खुपसणारे आहे, हे आता लपून राहिलेले नाही.
मुळात आज राज्याचा विस्तीर्ण भूभाग पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी टाहो फोडत आहे. शेतातील पिके करपून कोळसा झाली आहेत. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली ५,००० रुपयांची तात्पुरती मदत ही महागाईच्या आजच्या वणव्यात निव्वळ एक थट्टा आहे. त्यात भर म्हणून आता सरकारने नवीन फतवा काढला आहे की, हे पाच हजार रुपये फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळतील ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि ज्यांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. सरकारी बाबूंचे पंचनामे कधी होणार आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसे कधी पडणार? आधीच अस्मानी संकटाने खचलेल्या शेतकऱ्याला आता सुलतानी नियमांच्या चक्रव्यूहात अडकवून सरकारने आपली असंवेदनशीलताच दाखवून दिली आहे.
दुष्काळाची झळ फक्त जमीनमालक असलेल्या शेतकऱ्यालाच बसते असे नाही, तर शेतावर घाम गाळणारा भूमिहीन शेतमजूरही यामुळे उद्ध्वस्त होतो. जेव्हा शेतात पीकच उरलेले नाही, तेव्हा या मजुरांना काम कुठून मिळणार आणि त्यांच्या कुटुंबाची चूल कशी पेटणार? सरकारने जाहीर केलेल्या या तुटपुंज्या आणि अटींच्या चौकटीत अडकलेल्या मदतीच्या कक्षेत भूमिहीन शेतमजुरांचा कुठेही विचार केलेला दिसत नाही. या मजुरांनाही दुष्काळी मदतीच्या कक्षेत आणून थेट आर्थिक मदत देणे गरजेचे होते, परंतु घोषणाबाजीत मग्न असलेल्या सरकारला या गरिबांच्या अश्रूंची किंमत उरलेली नाही.
हे सरकार केवळ इव्हेंटबाजी आणि जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात धन्यता मानत आहे, परंतु ज्या बळीराजाच्या जिवावर राज्याचे अर्थचक्र चालते, त्याला देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. पंचनाम्यांची सक्ती आणि ३३ टक्क्यांची अट रद्द करून राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्ताला तात्काळ आणि सन्मानजनक मदत दिली गेली नाही, तर हा बळीराजा सरकारला कधीच माफ करणार नाही. शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेची दिवाळी साजरी करू पाहणाऱ्या राज्यकर्त्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित!
أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday