बाळाच्या विक्रीचा पर्दाफाश, डॉक्टर दांपत्य फरार; पोलिसांनी रुग्णालय, घर केले सील!

 


भोजने मॅटर्निटी हॉस्पिटल सील करण्यात आले! डॉक्टर दांपत्य फरार!

दि. २३ अमरावती:


अमरावती शहरात एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतच्या काळात संगनमत करून तिच्या नवजात बाळाचा ३.५० लाखात (साडेतीन लाख रुपयांत) सौदा करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलत डॉ. वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल भोजने यांच्यासह तिघा जणांवर पॉक्सो आणि मानवी तस्करीचा गंभीर गुन्हा दाखल केला असून, प्रशासनाने त्यांचे रुग्णालय आणि घर सील केले आहे.


या प्रकरणातील १७ वर्षे ४ महिने वयाच्या पीडित अल्पवयीन मुलीचे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते, ज्यातून ती गर्भवती राहिली. मुलीच्या पोटात गर्भ वाढू लागल्याची कुणकुण लागताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी अमरावती येथील डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालयात नेले. डॉक्टर वैशाली भोजने यांनी तपासणी केल्यानंतर गर्भ पाच महिन्यांचा असल्याचे स्पष्ट केले आणि प्रसूतीपर्यंतचे सर्व उपचार याच रुग्णालयात पार पाडण्याचे ठरले. यादरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीने एका गोंडस बालकाला जन्म दिला. मात्र, या मुलाचे संगोपन करण्याऐवजी जन्माला आलेल्या बालकाची परस्पर साडेतीन लाख रुपयांत विक्री करण्याचा काळाबाजार रचण्यात आला.
शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची धडक कारवाई:
या संपूर्ण गैरप्रकाराची कुणकुण शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांना लागली. पक्षाच्या महिला पदाधिकारी वर्षा भोयर आणि कोमल बेंद्रे यांनी अत्यंत सतर्कता बाळगत एक अचूक सापळा रचला. त्यांनी वेळीच पाऊल ठेवून डॉक्टर आणि इतरांचा हा बालके विक्रीचा डाव उधळून लावला, ज्यामुळे हा गंभीर गुन्हा उजेडात आला.

या प्रकरणात पीडित मुलीवर अकाली मातृत्व लादणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह, डॉक्टर वैशाली भोजने आणि त्यांचे पती प्रफुल भोजने या तिघांविरुद्ध बलात्कार, पॉक्सो कायदा, गुन्हेगारी धमकी तसेच मानवी तस्करीच्या कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करत डॉ. वैशाली भोजने यांच्या रुग्णालय आणि घराची कसून झाडाझडती घेतली. यादरम्यान महत्त्वाचे कागदपत्र आणि वैद्यकीय मशीन्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, रुग्णालय आणि घराला पूर्णपणे सील ठोकण्यात आले आहे.
पोलीस तपास सुरू, आरोपी डॉक्टर दांपत्य फरार:
गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी डॉक्टर वैशाली भोजने आणि प्रफुल भोजने हे दांपत्य सध्या फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे आणि यापूर्वी अशा प्रकारे किती बालकांची विक्री झाली आहे, या दिशेने पोलीस सखोल तपास करत आहेत. अमरावती शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday