महाडीबीटीवरील अर्ज प्रक्रियेत बदल
अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्र शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून पीएम यशस्वी प्री अँड पोस्ट मॅट्रीक शिष्यृत्ती योजनेंतर्गत ओबीसी,ईबीसी आणि डिएनटी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज आता केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (एनएसपी) भरावे लागणार आहेत. याबाबत केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांची अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.
पीएम यशस्वी पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन २०२६-२७ मध्ये इयत्ता ९वी व १०वीमध्ये शिकणाऱ्या ओबीसी,ईबीसी आणि डिएनटी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र मुल आणि मुली यांना या योजनेंतर्गत अर्ज करता येणार असून, अर्ज केवळ एनपीएस पोर्टलवरून भरावा असे सांगण्यात आले आहे. मात्र, पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या इयत्ता ९वी व १०वीतील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच इयत्ता पाचवी व आठवीतील मुलींच्या शिष्यवृत्तीचे अर्ज सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर भरता येणार आहे.
महाडीबीटीवरील चार योजनांच्या अर्ज प्रक्रियेत बदल
महाडीबीटी पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या काही शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज पूर्वीप्रमाणे महाडीबीटी २.० पोर्टलवरच भरावे लागणार आहेत. यात जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधील विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हिजेएनटी) आणि विशेष मागास प्रवर्गातील (एसबीसी) विद्यार्थ्यांसाठी गुणवंत शिष्यवृत्ती, व्हीजेएनटी, एसबीसी आणि दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) विद्यार्थ्यांसाठी तसेच खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व परीक्षा फी भरणे, सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्त्याचा समावेश आहे.
पीएम यशस्वी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इतर मागासवर्गीय (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय मुलींसाठीही मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची तरतूद आहे. या चार योजनांचे नवीन अर्ज केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरूनच भरता येणार आहेत. या योजनांसाठी नवीन अर्ज भरण्याची सुविधा महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध राहणार नाही.
शिष्यवृत्ती योजनांच्या अर्ज प्रक्रियेत झालेल्या या बदलांची सर्व शाळा व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना संबंधित योजनांची माहिती देऊन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच अर्ज कोणत्या पोर्टलवर भरायचा आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
