अमरावतीत 23 ते 26 ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे निवडपूर्व प्रशिक्षण


 

अमरावती,दि.१७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : येथील जिल्हा क्रीडा संकुलात गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चा समारोप झाला. स्पर्धेत पुणे,नाशिक कोल्हपूरसह अमरावती विभागाच्या खेळाडूंनी विविध वजनी गटांत पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. येत्या २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात राष्ट्रीय ७० व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे निवडपूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.


 

              क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशन आणि अमरावती जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चा समारोप झाला.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे होते. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल माऊली, माजी अध्यक्ष प्रमोद चौंडकर, सचिव प्रकाश बेंद्रे तसेच अमरावती जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव शक्ती दीक्षित यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

             राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आणि उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.गणेश जाधव यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या तांत्रिक अधिकारी, पंच आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप रोंटिये यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी केले.

 

             १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित या  राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक या आठ विभागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेत खेळाडूंनी विविध वजनी गटांत उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले.


      स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपदांमध्ये १७ वर्षे मुलींच्या गटात पुणे विभाग, १७ वर्षे मुलांच्या गटात नाशिक विभाग, १९ वर्षे मुलींच्या गटात पुणे विभाग, तर १९ वर्षे मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने बाजी मारली. स्पर्धेत अमरावती विभागाच्या खेळाडूंनीही विविध वजनी गटांत पदके मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. १९ वर्षे मुलांच्या ११० किलो वजनी गटात पियुष किरण आठवले याने प्रथम क्रमांक मिळविला, तर ११० किलोवरील वजनी गटात श्लोक विजय ससुरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे मुलींच्या ६१ किलो वजनी गटात पूजा संजय थेपकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. विविध गटांतील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदके, पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

 

राष्ट्रीय स्पर्धेसाठी अमरावतीत प्रशिक्षण शिबिर

७०व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग संघाचे निवडपूर्व प्रशिक्षण शिबिर २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार आहे.


أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday