सायबर गुन्हेगारांचा नवा डाव: ८० च्या 'रेट्रो लुक'च्या आडून मोठी फसवणूक!




दि. १५ अमरावती: 
सध्या सोशल मीडियावर '८० च्या दशकातील रेट्रो लुक' (1980s Retro AI Photo Trend) चे फोटो शेअर करण्याचा ट्रेंड खूप वेगाने व्हायरल होत आहे. नागरिक स्वतःचे फोटो एआय (AI) ॲप्स किंवा त्रयस्थ (Third-party) लिंक्स वापरून विंटेज किंवा जुन्या काळातील लुकमध्ये बदलत आहेत. परंतु, नागरिकांच्या याच आवडीचा आणि क्रेझचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांनी ठगीचा एक मोठा सापळा रचला असून अमरावती सायबर पोलिसांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे.
सायबर गुन्हेगार नक्की काय करत आहेत?
माहितीची चोरी: युजर्स जेव्हा या ट्रेंडमध्ये भाग घेण्यासाठी जुन्या आठवणींचे किंवा सध्याचे हाय-रिझोल्युशन फोटो अनोळखी एआय ॲप्स किंवा एपीके (APK) फाइल्सद्वारे अपलोड करतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा संवेदनशील डेटा (Facial-data) सायबर चोरट्यांच्या हाती लागतो.
 या चोरलेल्या फोटोंचा आणि डेटाचा वापर करून सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल्स तयार करू शकतात. तसेच, आधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने डीपफेक  व्हिडिओ किंवा फोटो बनवून नागरिकांना ब्लॅकमेल देखील केले जाऊ शकते. 
जुन्या फोटोंसोबत लिहिलेली ठिकाणांची नावे, नातेवाईक किंवा मित्रपरिवाराचा उल्लेख, आणि जुन्या पोस्टवरील कमेंट्समधून नागरिकांच्या खाजगी आयुष्याची महत्त्वाची माहिती चोरट्यांना सहज मिळते. या सर्व माहितीचे जाळे विणून सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक किंवा ओळख चोरी (Identity Theft) करत आहेत. 
या धोक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तेलंगाना सायबर सिक्युरिटी ब्युरो (TGCSB) आणि स्थानिक सायबर पोलिसांनी खालीलप्रमाणे अत्यंत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत: 
सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या विनामूल्य किंवा अनलिमिटेड फोटो एडिटिंगच्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
अधिकृत प्ले-स्टोर (Play Store) सोडून कोणत्याही अनोळखी किंवा तिसऱ्या पाक्षिकांच्या वेबसाईटवरून APK फाइल्स डाऊनलोड करू नका. 
जर एखादे फोटो एडिटिंग ॲप तुमच्या फोनमधील एसएमएस (SMS), कॉन्टॅक्ट्स , किंवा बँक डिटेल्सची परवानगी मागत असेल, तर त्वरित सावध व्हा आणि ती परवानगी नाकारा.
 तुमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्सचे प्रायव्हसी सेटिंग कडक ठेवा. अनोळखी व्यक्तींना तुमच्या खाजगी पोस्ट्स किंवा फोटो दिसणार नाहीत याची काळजी घ्या.
आपले सोशल मीडिया आणि बँक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर नक्की करा.
 'ट्रेन्ड'च्या नादात स्वतःची वैयक्तिक माहिती आणि फोटो अनोळखी टूल्सवर उघड करू नका; कारण आजचा एक छोटासा फोटो उद्याच्या मोठ्या सायबर फसवणुकीचे कारण ठरू शकतो! जर तुमची फसवणूक झाली तर त्वरित १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday