597 कामांना प्रशासकीय मान्यता
अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'जलयुक्त शिवार अभियान 2.0' अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पावसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि जमिनीचा पोत सुधारणे या त्रिसूत्रीवर भर देण्यात येत असून या उन्हाळ्यात विविध यंत्रणांमार्फत मोठ्या प्रमाणावर कामांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष निधीतून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना 597 कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत 603 कामांसाठी 5 कोटी 15 लाख रुपये, मृद व जलसंधारण विभाग (जिल्हा परिषद) अंतर्गत 11 कामांसाठी 1 कोटी 69 लाख रुपये, तर मध्यम व लघु पाटबंधारे विभाग अचलपूर अंतर्गत 4 कामांसाठी 1 कोटी 28 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी अभियानाला अतिरिक्त प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. पाणी साठवणुकीच्या नवीन सुविधा निर्माण झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून, याचा थेट फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभाग पूर्ण तत्परतेने हे अभियान राबवित आहेत.