हिंद दी चादर कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 1, 2025

हिंद दी चादर कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा




*मान्यवरांचे आवाहन

अमरावती, दि. 2 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात काल  हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महंत जितेंद्रजी महाराज, राज्यस्तरीय समितीचे सदस्य किसन राठोड, सदाशिव चव्हाण, नंदू पवार, डॉ. निख्खू खालसा, रवींद्रसिंग सलुजा, अनिता पवार , छाया राठोड, बबीता राठोड,  ॲड. नवलानी, वासुदेव महाराज, दिनेश सचदेव आदी उपस्थित होते.

जितेंद्र महाराज यांनी सर्व समाजाच्या वतीने शहिदी समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम एक बलिदानाची आठवण व्हावी, तसेच आपल्या संस्कृतीची जाण नव्या पिढीला व्हावी, यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून आपली संस्कृती जपली जाणार आहे. गुरु तेग बहादुर यांनी धर्म रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यांचा त्याग पुढील काळातही माहिती होण्यास या कार्यक्रमामुळे मदत मिळणार आहे.

राज्यस्तरीय समिती सदस्य किसन राठोड यांनी कार्यक्रमामागील सरकारची भूमिका सांगितली. गुरु तेग बहादुर यांची शहादत ही संपूर्ण मानवतेसाठी होती. त्यांच्या बलिदानामुळेच देश टिकून आहे. त्यांचे स्मरण व्हावे, तसेच आपल्या समृद्ध इतिहासाची माहिती समाजाला होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. शासनाने एक चांगला उपक्रम हाती घेतला असून राज्यभरात तीन कार्यक्रम होणार आहे. यासाठी समितीही गठीत करण्यात आली आहे. प्रचार आणि प्रसारासाठी गाव, तांड्यामध्ये चित्ररथ फिरविण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या भेटी घेण्यात येत आहे. शाळांमधून गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखविण्यात येत आहे.

या सर्व माध्यमातून समाजाच्या मनाचा विकास होणे आवश्यक आहे. महान व्यक्तींचे कार्य पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या कार्यामधून समाज प्रभावित होणार आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने सेवक होऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. शासनाने कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे देश घडविण्यासाठी नागपूर येथील कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे  नियोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत लोकसभागातून चार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अमरावती ते नागपूर मार्गावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

डॉ. निख्खू खालसा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी गुरु तेग बहादुर यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच उपस्थित त्यांच्या प्रश्नांचचे निराकरण करण्यात आले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages