अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील दुसरा मोठा सिंचन प्रकल्प म्हणून निम्न पेढी प्रकल्प साकारण्यात येत आहे. यातील भुसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. सात गावातील बहुतांश नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतरही केले आहे. प्रकल्पातील बाधित गावांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात निम्न पेढी प्रकल्पातील बाधित गावांच्या पुनर्वसन, वाढीव मोबदला आणि पुनर्वसित गावातील मूलभुत आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम., अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी प्रसेनजित चव्हाण, सिंचन विभागाच्या अधिक्षक अभियंता मेघा अक्केवार, तहसिलदार विजय लोखंडे, अजितकुमार येळे आदी उपस्थित होते.
श्री. येरेकर म्हणाले, निम्न पेढी प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुर्णत्वास गती देणे आवयश्यक आहे. प्रकल्पात सुमारे 75 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार असून यातून 1 हजार 300 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणीही उपलब्ध होणार आहे. प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाईपने पाणी पुरवठा होणार असून सुमारे 350 किलोमीटरची पाईप लाईन टाकण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून निम्न पेढी प्रकल्प महत्वाचा असून प्रशासनाकडून प्रकल्प पुर्ण करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहे. यात प्रामुख्याने बुडीत क्षेत्रातून अद्यापही स्थलांतरीत झाले नसलेल्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. पुनर्वसनासाठी ज्या गावांना जमीन आवश्यक आहे, त्यांची उपलब्धता केली जाणार आहे.ही जागा नागरिकांच्या सोयीची असणार आहे. येत्या १५ जून पर्यंत नागरिकांनी जागेचा ताबा घेतल्यास त्यांना घरकुल योजनेत समाविष्ट करून घर बांधण्यासाठी सहाय्य पुरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाढीव मोबादला म्हणून १०१ कोटींचा निधी प्राप्त झाला असून २७८ कुटुंबांना पहिल्या टप्प्यात ५७
कोटींचे वाटप करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम पुर्ण करून यात पाणी साठविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांनीही प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले.

Post a Comment
0 Comments