जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृती - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 12, 2026

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृती





 

अमरावती, दि.१३(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): येत्या ३१ मे २०२६ च्या जागतिक तंबाखू नकार दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्हा आरोग्य विभागामार्फत तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार’ हा निर्धार करीत १ मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णांना तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ देण्यात आली.

 तंबाखू उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असला, तरी तोंडाच्या कॅन्सरमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या अहवालानुसार, ८० ते ९० टक्के तोंडाच्या कॅन्सरचे कारण तंबाखू आहे. भारतामध्ये दरवर्षी तब्बल १३.५० लाख लोक यामुळे प्राणाला मुकतात. तंबाखूमुळे मुख, फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदयविकार, लकवा आणि गरोदर महिलांमध्ये गर्भपातासारखे गंभीर धोके निर्माण होतात,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिनोद पवार यांनी दिली.

 आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्षभर समुपदेशन केंद्र चालवले जाते. तरीही व्यसन करणाऱ्यांनी दर महिन्याला स्वतःच्या तोंडाची तपासणी करावी. तोंडात पांढरे-लाल चट्टे दिसणे, तोंड कमी उघडणे किंवा १५ दिवसांपेक्षा जास्त काळ जखम न भरणे ही कर्करोगपूर्व लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करावी, कारण सुरुवातीच्या टप्प्यात उपचार झाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

 टपा (COTPA) कायदा २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकणाऱ्यांवर कलम ४ नुसार २०० रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच, कलम ६(ब) नुसार शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीवर कडक बंदी आहे. नागरिकांनी भुलथापांना बळी न पडता तंबाखूमुक्त व्हावे आणि आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

                                                                *****

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages